आंबव उत्सव २०२०


सकाळी ७ ची वेळ,देवळात गुरुजींचे मंत्रपठण सुरु आहे,देवळाच्या मागच्या बाजूला बायकांची स्वयंपाकाची गडबड सुरु आहे. एक एक तास गायत्री मंत्रपठण करण्यासाठी साठी तरुण मुले तयार आहेत,आणि गाभाऱ्यात श्री सूर्यनारायणाची मूर्ती नखशिखान्त सजलेली आहे. हे दृश्य आमच्या आंबव च्या श्री सूर्यनारायणाच्या उत्सवाचे. माघ शुद्ध प्रतिपदेपासून सुरु होणारा हा उत्सव रथसप्तमीपर्यंत चालू असतो.
दरवर्षी नित्यनेमाने आम्ही सगळे आंबवला जातो. मे महिन्यात नावाप्रमाणेच आंब्यांच्या राशीने भरलेले हे इटुकले गाव उत्सवाच्या वेळी माणसांनी भरून जाते. उत्सवाचे यजमानपद हे ६ घरात वाटले गेले असल्याने आमच्याकडे दर ६ वर्षांनी हा उत्सव असतो. 
जानेवारी महिना सुरु झाला कि सगळ्यांना आंबव ला जायचे वेध लागतात. मला कधीच असे वाटले नव्हते कि मी कीर्तन हा प्रकार ऐकीन. पण ह्याची सवय आंबव मधेच लागली. दर रात्री होणारे कीर्तन हा उत्सवाचाच एक भाग. मस्त गुलाबी थंडीत अंगावर शाल पांघरून कधी देवळात तर कधी घरातल्याच झोपाळ्यावर झुलत कीर्तनकारांचे कीर्तन ऐकल्यावर आपण कुठेतरी वेगळ्याच दुनियेत असल्याचा भास होतो. लळिताच्या कीर्तनानंतर मिळणारी शेरणी म्हणजे प्रसादाचे पेढे, नारळ,साखर,गुळ एकत्र करून तयार केलेलं हे डेजर्ट आपल्या सिझलिंग ब्राउनी ला कुठच्या कुठे मागे टाकतं. रथसप्तमीच्या दिवशी गावजेवणाला अतिशय रुचकर स्वयंपाक असतो. गरम गरम पुऱ्या, मसालेभात,सोबतीला भजी, पापड, चटण्या, कोशिंबिरी,एखादा गोड़ पदार्थ अश्या सगळ्याने ताट भरतं. अगदी आताच्या भाषेत सांगायचे झाले तर #soulfood किंवा #bliss का काय म्हणतात ते हेच! मुळातच मला सगळ्या पदार्थांमध्ये प्रेमाची,आपुलकीची चव जरा जास्तच जाणवते.
सगळ्याच पोंक्षे मंडळींमध्ये जन्मापासूनच एक कलाकार दडला आहे. "रंगल्या रात्री अश्या" ह्या कार्यक्रमामध्ये ह्या कलागुणांची रसिकप्रेक्षकांवर बरसात होते. शहराच्या गर्दीत, धकाधकीच्या जीवनात कला जोपासायची राहून गेलेला कलाकार गावच्या मोकळ्या वातावरणात खुलून येतो. आणि मग गाण्याच्या मैफिली रंगतात, कोणी स्वतः केलेल्या कविता सादर करतं तर कोणी आपल्या अभिनयाची झलक दाखवतो.
सुद्यवाने "आमच्या वेळी हे असं नव्हतं हो" असे म्हणणारे मोठे लोक आमच्या गावात नाहीतच, उलट जास्तीत जास्ती नवीन टेकनॉलॉजि चा उत्सवात कसा फायदा होईल हे शिकण्यास सर्वच मोठे लोक तयार असतात. आणि मग मोठ्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली आजची तरुण पिढी सुद्धा ह्या उत्सवाचे नियोजन अगदी व्यवस्थित करते. श्री नारायणाच्या सेवेत काही कमी पडायला नको म्हणून प्रत्येक जण आपापल्या परीने झटत असतो.
यंदा उत्सवाचे हे १०० वे वर्ष!! गेले वर्षभर ह्या उत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. "The Day" साठी कमिटी सज्ज झालीय. अनेक कार्यक्रमाची रेलचेल ह्यावर्षी सुद्धा आहे. 
ह्यावर्षी जर्मनी ला असल्या कारणाने उत्सवाला जायला जमणार नाही पण आंबव च्या उत्सवातील सकारात्मक ऊर्जा videochat आणि photos च्या रूपात माझ्यापर्यंत पोचेल ह्याची खात्री आहे.
" रथावरी हा सूर्यनारायण,डोळे भरून पहिला….." ह्या आरतीच्या ओळी डोक्यात गुणगुणायला सुरवात झाली आहे. कारण लहानपणापासून आंबव आणि आंबव च्या उत्सवासाठी कायम मनात एक खास जागा आहे. 


२२ जानेवारी २०२०



Comments